Breaking News

नागोठण्यात काही व्यवसायांस सशर्त परवानगी

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये 20 एप्रिलपासून काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात व्यापारी संघटनेच्या सूचनेनुसार सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी, रोहे तहसील कार्यालय व संबंधित यंत्रणेशी प्रत्यक्ष संवाद साधून व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. सदर बैठकीत अनेक निर्णय निश्चित करण्यात आले.

त्यात नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मिरची व मसाले विकण्यास व कुटण्यास 3 मेपर्यंत स्थगिती देण्यात आली. या आदेशाचा भंग करणार्‍यांवर दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. स्पेअर पार्ट्स व ऑटोमोबाइल दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर संपर्क नंबर लिहून ठेवावा.  आवश्यकतेनुसार ट्रक, टेम्पो या मालवाहतुकीच्या वाहनाचा चालक किंवा मालकाने फोनद्वारे संपर्क साधल्यास दुकान मालकाने तेथे येऊन त्याला सामान द्यावे. दिवसभर दुकाने उघडून बसण्यावर बंदी राहणार आहे. हाच नियम गॅरेजसाठीही राहणार असून कार तसेच दुचाकीची दुरुस्ती करणे व त्यांना स्पेअर पार्ट्स देण्यास मनाई आहे. बिल्डिंग मटेरियल विक्रेते व हार्डवेअर यांना ठरावीक वेळेत आवश्यकतेनुसार सुतार व गवंडी यांना मटेरियल देऊ शकतील, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवायला हवे. दुकान दिवसभर उघडून बसता येणार नाही.बांधकाम व्यावसायिक व सिव्हिलची कामे सुरू राहतील, मात्र  कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी असणे बंधनकारक राहणार आहे. कामगारांची ने-आण करण्यास मनाई आहे. ग्रामपंचायत हद्दीत महामार्गावरील  दररोज केवळ एकच ढाबा किंवा हॉटेल आळीपाळीने सुरू राहील. बसून खाण्यासाठी प्रतिबंध आहे. फक्त माल वाहनांच्या चालक-वाहकांना पार्सल जेवण देण्याची मुभा आहे. चहा, नाश्ता व अन्य व्यवसाय करू नयेत. याव्यतिरिक्त अन्य व्यवसाय पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. सर्वांनी या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांच्यासह उपाध्यक्ष अनिल काळे, कार्यकारी अध्यक्ष दिनेश परमार व सर्व संचालकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply