Breaking News

मनोमीलनाची नांदी

राजकारणात वावरत असताना दोन पक्षांमध्ये वादविवाद होतच असतात, पण त्या वादविवादाला तिलांजली देऊन भाजप, शिवसेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एल्गार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदावर विराजमान करण्याचा निर्धार केला आहे. त्या निर्धाराला शिवसेनेनेही आता प्रामाणिकपणे साथ द्यायला सुरुवात केली आहे.

राज्यात शिवसेना-भाजपची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे धाबे दणाणल्याचे जाणवू लागले आहे. याचाच फायदा लोकसभेबरोबरच विधानसभेतही होणार असल्याने दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची दुखावलेली मने सांधण्यासाठी भाजप, शिवसेनेने आता मनोमीलनातून संवाद साधण्यावर भर दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात अमरावती, नागपूर आदी ठिकाणी मनोमीलन मेळावे घेण्यात आले. आता सोमवारी पुण्यात हा मनोमीलन संवाद मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मनोमीलन मेळाव्यातून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. विदर्भातील मनोमीलन संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप ही अभेद्य युती असून ती विचारांची आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकत्र असणारी युती पुढेही अशीच राहील. आम्हाला हिंदुत्ववादी पक्ष व हिंदुत्ववादी युती असल्याचा अभिमान आहे, परंतु आमचे हिंदुत्व संकुचित नसून राष्ट्रीय आहे. ज्याचे या देशावर प्रेम असेल तो कुठल्याही जाती, पंथ व धर्माचा असला, तरी अशा व्यक्तीला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये स्थान आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित ही युती आहे. म्हणूनच ही युती टिकली असून पुढेदेखील टिकणार आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपसोबत असणारा वाद हा राजकीय नव्हता. दोन्ही पक्षांमध्ये असणारे वाद जनतेच्या हितार्थ होते. जनतेपर्यंत योजना पोहोचून त्यांना लाभ मिळावा यासाठी संघर्ष होता, परंतु भाजपने मान्य केल्याने तलवारी म्यान झाल्या आहेत. सत्ता स्वार्थासाठी नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हवी आहे. सामान्यांच्या अपेक्षांवर पाणी पडायला नको यासाठी सत्ता पाहिजे, असे मतही ठाकरे यांनी मांडले. एकूणच शिवसेना, भाजपचा बदललेला सूर पाहता या वेळीही सन 2014च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच युतीलाच भरघोस जागा मिळतील असा विश्वास मतदारांना देखील वाटू लागला आहे. कारण देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच कणखर नेतृत्व असणे गरजेचे आहे, यावर आता सर्वसामान्य जनतेचा विश्वास बसू लागला आहे. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या 10 पक्षांच्या महाआघाडीपेक्षा विकासासाठी एकत्र आलेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्तेवर येऊ देणेच देशातील जनतेला योग्य वाटतेय. नुकत्याच झालेल्या पुलवामा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून पाकला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे विविध राष्ट्रांनी भारताच्या या कारवाईचे समर्थन करताना पाकला दूषणे दिली आहेत. याचा परिणाम भारतीय मतदारांवर देखील चांगल्या प्रकारे झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या हातातच आपला देश सुरक्षित राहू शकतो यावरही भारतीयांचा विश्वास बसला आहे. याचाच फायदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबरच शिवसेनेला देखील होणार आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply