पूर्णत: लॉकडाऊनपूर्वी लोकांची खरेदीसाठी झुंबड

श्रीवर्धन : प्रतिनिधी
औषधाची दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त भाजीपाला व सर्व व्यवहार बंद राहील असे अनेक मेसेज श्रीवर्धनमध्ये व्हॉट्सअॅप वरती फिरत होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी खरेदीसाठी श्रीवर्धन बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आपल्यापासून फक्त तीन किलोमीटर लांब आलेला आहे. याचे कोणतेही भान न ठेवता नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. श्रीवर्धन शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोस्ते या गावांमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्यानंतर श्रीवर्धनमधील व्यापार्यांनी ज्या ग्राहकांना किराणा सामान हवे असेल त्यांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीमध्ये गर्दी टाळण्यासाठी दुकानाचे शटर जरी बंद असले तरी व्हॉट्सअॅपवरती दुकानदाराला यादी पाठवल्यानंतर आपल्या घरी सामान रिक्षाने पोहोचणार होते. परंतु प्रशासन, व्यापारी संघटना व नागरिक यांच्यामध्ये समन्वय योग्यप्रकारे होत नसल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद राहील, असा अफवा सगळीकडे पसरली गेली. कोरोनाचे काय गांभीर्य आहे हे अजूनही काही नागरिकाला लक्षात येत नाही. आपल्याला भाजीपाला किंवा किराणा सामाना पेक्षा स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. कारण तो जगला तरच आपण पुढे खायला शिल्लक राहणार आहोत. परंतु याचे भान न राहता नागरिकांनी बाजारात गर्दी केल्यामुळे अखेर पोलिसांनी पुन्हा एकदा अनाऊंसमेंट करत बाजार उघडा राहील, असे जाहीर केले. अनेक वेळा पोलिसांकडून अनाऊन्समेंट करून सुद्धा अनेक मोटरसायकलस्वार विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरत असल्याचे दिसत होते.
‘वाहने जप्त करून गुन्हे दाखल करणार’
श्रीवर्धन येथे पोलिसांनी अशा अनेक जणांची वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. तसेच यापुढेही विनाकारण कोणीही फिरताना आढळल्यास त्यांची वाहने जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले आहे. तरी प्रशासनाने सक्त आवाहन केले आहे कि, कोणीही नागरिकांनी बाहेर पडू नये घरी राहा सुरक्षित राहा आपले सुरक्षारक्षक आपणच आहात.
RamPrahar – The Panvel Daily Paper