पनवेल : प्रतिनिधी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पुलाखालील भराव काढण्यात आल्याने यावर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली. पनवेल शहरात मागील वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात गाढी नदीचे पाणी पनवेल शहरातील साई नगर, बावन्न बंगला (दि. बा. पाटील नगर), पटेल मोहल्ला खाडी, वीट सेंटर, कोळीवाडा भागात 5-8 फुट पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चिंचपाडा भागात गाढी नदीवरील पुलाखाली मातीचा भराव असल्याने पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून दिली होती. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शहरात आणि महामार्गावर रस्त्याची आणि पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. आमदारांनी या पुलाचे ठेकेदार अशोका बिल्डकोंनचे एम. आर. पाटील यांना याबाबत सांगून तो भराव काढायला सांगितला असता त्यांनी गाढी नदीच्या पुलाखालील भराव माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यास सुरुवात केली.