

कर्जत : बातमीदार
शिरसे ग्रामपंचायत मधील शिवसेनेच्या पॅनल प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, त्या वेळी वेगवेगळ्या पक्षात असलेले भोईर कुटुंबीय उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेकडून उभ्या करण्यात आलेल्या पॅनलच्या थेट सरपंच पदाचे उमेदवार आरती संदीप भोईर आणि अन्य आठ उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ शिरसे येथील शिरसाई मंदिरात झाला. त्या वेळी शिरसे ग्रामपंचायतमध्ये गेली 20 वर्षे बिनविरोध सत्ता स्थापन करणारे आणि शासनाच्या सर्व योजना राबविणारे माजी सरपंच संतोष भोईर यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे वेगळ्या पक्षात असलेले बंधू भगवान भोईर आणि वसंत भोईर यांच्यासह नारायण भोईर हे उपस्थित होते.
भोईर कुटुंबातील आरती संदीप भोईर यांच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवारीमुळे सर्व भोईर कुटुंबीय प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपस्थित होते. हाच धागा पकडून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी भोईर कुटुंबाने अशीच एकजूट कायम ठेवून तालुक्यातील विकासाला आणखी हातभार लावावा, असे आवाहन केले.
शिरसे ग्रामपंचायतने एक आदर्श सरपंच दिला असून संतोष भोईर यांच्या कामाचा आदर्श ग्रामपंचायतचे नवीन सदस्य आणि सरपंच यांनी घ्यायला हवा, असे आवाहन केले. त्याच वेळी त्यांनी विरोधक काही आवश्यकता नसताना आणि ग्रामपंचायतीमध्ये सर्व शांततेत सुरू असताना निवडणुकीचा डाव मांडला आहे, असा आरोप केला. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले वसंत भोईर यांनी संतोष भोईर हे वेगळ्या पक्षात असले, तरी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये केलेली कामे ही कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे ही निवडणूकदेखील बिनविरोध करायला हवी होती, पण झाली नाही, मात्र विकासकामांच्या जोरावर संतोष भोईर यांचे सर्व उमेदवार विजयी होतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
प्रचाराचा नारळ फोडताना शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, ग्रामपंचायत सरपंच रतन वाघमारे, माजी उपसरपंच दीपक देशमुख, अरुण सावंत, मनीषा दळवी, विजय देशमुख, नंदकुमार देशमुख, लता देशमुख, शिवसेना विभागप्रमुख नारायण पायगुडे, तसेच श्रीराम भालीवडे, शंकर देशमुख, प्रवीण देशमुख, उमेश देशमुख, रवींद्र भोईर, गोपीनाथ भोईर यांच्यासह थेट सरपंच पदाचे उमेदवार आरती भोईर, तसेच सदस्यपदाचे उमेदवार दत्तात्रेय वाघमारे, गीता देशमुख, मंजुळा, शैला गुरव, अर्चना वाघमारे, महेंद्र भोईर, कल्पना गायकवाड आदींसह बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या शोभा पवार यादेखील उपस्थित होत्या.