Breaking News

मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक

वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर; सर्वपक्षीय संघर्ष समिती संतप्त

मुरूड : प्रतिनिधी

 मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक सुरू असून, हे वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने संताप व्यक्त केला आहे.

मुरूड येथील वीज मंडळाने काही दिवसापूर्वीच सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून दत्तमंदिर परिसरात वीज उपकेंद्राचे उद्घाटन केले होते. सदरचे वीज उपकेंद्र हे म्हसळे तालुक्यातील पाभरे येथून वीज वाहिन्या खेचत आणून दत्तमंदिर येथील उपकेंद्रात वीज आणण्यात आली होती. मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी सदरचे वीज उपकेंद्र असल्याचेच सांगितले होते,  परंतु सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश देशपांडे यांनी घणाघाती आरोप केला आहे की, हे वीज उपकेंद्र नसून हे इनडोअर स्विचिंग सेंटर बनवण्यात आले असून मुरूड तालुक्यातील 25 हजारपेक्षा जास्त वीज ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा घणाघाती आरोपही या समितीने केला आहे.

सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी प्रथमपासून वीज उपकेंद्र बनवण्याची होती व तसे सर्व अर्ज आम्ही वीज मंडळास सुद्धा दिले आहेत, परंतु एखादे स्विचिंग सेंटर बनवण्यास तीन कोटींचा खर्च येणार नाही. या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून याची रीतसर चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवेदनच सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश देशपांडे यांनी मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना देण्यात आले आहे.

या वेळी देशपांडे यांच्यासमवेत मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील, तालुका काँग्रेस आयचे उपाध्यक्ष सुदेश वाणी, कृष्णा अंबाजी, मुरूड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सज्जाद हसवारे, विनोद नवघरकर, समीर महाडिक, तुषार रोटकर, शबाब उलदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुरूड शहरात स्विचिंग सेंटर बनवल्यामुळे मुरूडच्या जनतेला पुन्हा तोच त्रास सहन करावा लागणार आहे. स्विचिंग सेंटरमुळे वीज समस्या कायमस्वरूपी नष्ट होणार नाही. स्थानिक आमदारांबरोबरच समस्त जनतेची आपण वीज उपकेंद्र बनवल्याचा आभास निर्माण करून फसवणूक केली आहेत. या अगोदर मुरूड तालुक्यातील उसरोळी ग्रामपंचायत हद्दीमधील वाळवंटी गावात स्विचिंग सेंटर बनवले होते. तेथे सुद्धा लाखो रुपये खर्च करण्यात आले होते, परंतु त्याचा उपयोग कोणताच न होता हे सेंटर धूळ खात पडले आहे. अशा आपल्या लापरवाहीमुळे वीज मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना नितेश देशपांडे यांनी सांगितले की,  मुरूड तालुक्यातून वीज मंडळाला दीड कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो.सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी होती की, वीज उपकेंद्र व्हावे परंतु या वीज मंडळाने आमची फसवणूक केली आहे. स्विच सेंटर बांधून कोणताही फायदा होणार नाही. 15 वर्षांपूर्वी वाळवंटी येथे स्विच सेंटर बांधण्यात आले, परंतु त्याचा कोणताही वापर न होता ते बंद स्थितीती ठेवण्यात आले आहे. जनतेने वीज उपकेंद्राची मागणी केली होती, परंतु तयार करतेवेळी यांनी स्विच सेंटर बनवले याचा मी वीज मंडळाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. लवकरच वीज मंडळाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी त्यांनी दिला आहे.

याबाबत मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी आपली बाजू मांडताना सांगितले आहे की, मुरूड येथील 22 केव्ही वीज उपकेंद्र असून म्हसळा येथील पाभरे येथून 40 किलोमीटर येथून वीज आणण्यात आली आहे. एक्स्प्रेस फिडर इनकमर या पूर्वी मुरूडला ही सुविधा उपलब्ध नव्हती, परंतु ही सुविधा प्राप्त झाल्याने 100/22 केव्ही वीज उपकेंद्रांमुळे पूर्वीसारखी वीज जाण्याचे प्रमाण फार अल्प राहणार आहे. पाभरे येथील वीज वाहिन्यांवर दोन इनकमर बसवल्यामुळे कमी वीज दाबाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. पूर्वी होणारे लाइन फॉल्ट, वारंवार जाणारा वीजपुरवठा, 10 तासापेक्षा वीज गायब होण्याचे सर्व प्रमाण 22 केव्ही उपकेंद्र झाल्याने नष्ट होणार आहेत. सध्या जर वीज गेली तरी ती त्वरित येऊ शकते. पूर्वीचे असणार्‍या सर्व समस्या नाहिशा झाल्या असताना मग वीज मंडळाने जनतेची फसवणूक केली हे म्हणणे कितपत योग्य ठरणार आहे याचा जनतेनेच विचार करावा, अशी आपली बाजू मांडताना येरेकर म्हणाले आहेत.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply