राम हिसालगे या तरुणाने घडविला आदर्श

कर्जत : बातमीदार
आपण या समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कुटुंब आणि समाजापासून दुरावलेले अनेक मनोरुग्ण दिसत असतात, मात्र आपल्या कामात व्यस्त होऊन आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. बहुदा असेच होते, मात्र नेरळ परिसरात फिरत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पाहून येथील तरुण हा फार व्यथित झाला आणि जमेल ती धडपड करून त्याने त्या मनोरुग्ण महिलेला मनोरुग्ण केंद्रात दाखल केले आहे. माणुसकीचे एक नवे जिवंत उदाहरण निर्माण करत या तरुणाने इतर तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
नेरळ खांडा-वाल्मिकीनगर परिसरात गेले काही दिवस एक मनोरुग्ण महिला फिरत होती. दिवसभर इतरत्र फिरून जे मिळेल त्यावर गुजराण करायची आणि रात्री रस्त्याच्या कडेला मिळेल त्या झाडाजवळ झोपायची. गेले काही दिवस तिचा हा नित्यक्रम असल्याने तिच्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही किंवा देऊनही दुर्लक्ष केलं गेलं, मात्र तिची ती अवस्था पाहून येथील एक तरुण राम हिसालगे हा अस्वस्थ झाला. त्यामुळे त्याने तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली, परंतु तिने एक शब्दही तोंडातून उच्चारला नाही. त्यामुळे कदाचित तिला बोलता येत नसेल असे रामला वाटले. त्या निराधार मनोरुग्ण महिलेला मदत करायची असा त्याने चंग बांधला आणि त्याने धडपड सुरू केली. सोशल मीडियावर त्याने प्रकार टाकून मदत मागितली. त्यामुळे त्याला कर्जत येथील श्रद्धा फाऊंडेशनचा पत्ता मिळाला.
डॉ. भरत वाटवानी यांनाही मनोरुग्णांची ही अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले होते. राम हिसालगे या तरुणाला श्रद्धा फाऊंडेशनचा पत्ता मिळाल्यावर त्याने नेरळ पोलिसांच्या मदतीने तिथे फोन करून या महिलेसाठी काय करता येईल याबद्दल माहिती घेतली. फाऊंडेशनेही महिलेला आपल्याकडे उपचारासाठी ठेवून घेण्यास सकारात्मकता दर्शवली. त्यानुसार हिसालगे यांनी नेरळ पोलीस, आपले भाऊ वैभव हिसालगे व विपुल हिसालगे यांच्या मदतीने त्या महिलेला कर्जत वेणगाव येथील श्रद्धा फाऊंडेशन येथे दाखल केले. त्या महिलेला बोलता येत नसल्याने तिचे नाव, गाव याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही.
राम हिसालगे या तरुणाने माणुसकी या नात्याने त्या महिलेला केलेल्या मदतीमुळे तिला श्रद्धा फाऊंडेशन येथील मायेचा निवारा मिळाला आहे. आपल्या आजूबाजूलाही अशाच पद्धतीचे मनोरुग्ण असलेले चित्र अनेकदा असते, मात्र प्रत्येक जण त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करत पुढे जात असतो, मात्र थोडासा वेळ त्यांच्यासाठी दिल्यास आपल्याच जवळपास असलेल्या त्यांच्यासाठी झटणार्या संस्था त्यांच्यावर उपचार करू शकतात.
त्यासाठी गरज आहे ती त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. हे राम हिसालगे या तरुणाने दाखवून तरुणांसाठीच नव्हे, तर समाजातील सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.