Breaking News

गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट द्यावी; मूर्तिकार, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी

पेण ः प्रतिनिधी

जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरातील गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायालाही संकटाचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट देण्याची मागणी येथील कारखानदारांकडून केली जात आहे. टाळेबंदीमुळे गणेशमूर्ती बनविण्याचे सर्वच काम बंद आहे. त्यामुळे गणेशमूर्तिकारांचे अतोनात नुकसान होत आहे.

पेण तालुक्यात गणेशमूर्ती बनवणार्‍या 500 कार्यशाळा आहेत. यात जवळपास 10 हजार लोक काम करतात. दरवर्षी शहरात 20 ते 25 लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या गणेशमूर्ती देश-विदेशात पाठविल्या जातात, मात्र टाळेबंदीमुळे सध्या गणेशमूर्ती बनविण्याचे कामच ठप्प झाले आहे. त्यामुळे मूर्तिकार कार्यशाळा चालक आणि कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

ही बाब लक्षात घेऊन टाळेबंदीतून पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला सूट दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. टाळेबंदीमुळे राज्याची विस्कळीत झालेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या उद्योगांना पुन्हा चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून पेण तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट द्यावी, अशी मागणी मूर्तिकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मार्च ते जून महिन्यात गणेशमूर्ती बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यानंतर तयार झालेल्या गणेशमूर्तींचे रंगकाम सुरू होते, मात्र कार्यशाळाच बंद असल्याने मूर्ती बनविण्याचे काम सध्या पूर्ण ठप्प झाले आहे. यामुळे मूर्तिकारांचे गणेशमूर्ती बनविण्याचे नियोजनही कोलमडले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply