Breaking News

‘कॉरिडॉर’मुळे घरे बाधित होऊ नयेत, जमिनीचाही योग्य मोबदला मिळावा

प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल आणि उरण तालुक्यातून जाणार्‍या मल्टीमॉडेल कॉरिडॉर रोड प्रकल्पासंदर्भात दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती कोअर कमिटीची प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत बैठक झाली. या प्रकल्पात घरे बाधित होऊ नये, तसेच राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मल्टीमॉडेल कॉरिडॉरसंदर्भात पनवेलचे विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले व एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांसोबत सोमवारी (दि. 8) सायंकाळी ही पहिली बैठक झाली.

पनवेल-उरणमधील 44 गावांतील भूसंपादनासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे; तर विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर प्रांत अधिकार्‍यांच्या बैठका चालू आहेत. यासंदर्भात विविध संघटनांनी लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीला आपले अर्ज दिले व याप्रश्नी लक्ष घालून बाधित शेतकर्‍यांना न्याय देण्याची विनंती केली आहे. त्या अनुषंगाने संघर्ष समितीचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात तातडीने बैठक बोलावण्याची विनंती प्रांताधिकार्‍यांना केली होती. त्यानुसार सोमवारी झालेल्या बैठकीत प्रकल्पासंदर्भात समिती सदस्यांसोबत विस्तृत चर्चा झाली.

पनवेल आणि उरण तालुक्यातील 44 गावांमधून मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प जाणार आहे. या प्रकल्पात घरे बाधित होऊ नये, तसेच राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी करून त्यावर चर्चा करण्यात आली. या वेळी या प्रकल्पाची पूर्ण माहिती प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात यावी आणि संघर्ष समितीबरोबर चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले.

या बैठकीला प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, एमएमआरडीचे अधिकारी, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील, सदस्य आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील, सचिव महेंद्र घरत, निमंत्रक अतुल दि. बा. पाटील, भूषण पाटील, मेघनाथ तांडेल, जे. एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, शिरीष घरत, सुदाम पाटील, सुधाकर पाटील, नंदराज मुंगाजी, प्रभाकर जोशी, अनिल नाईक, सुरदास गोवारी, केसरीनाथ पाटील, संतोष पवार, जे. डी. तांडेल आदी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply