Breaking News

चेन स्नॅचिंग करणार्या अट्टल गुन्हेगाराला अटक

पनवेल : वार्ताहर

खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या मोहम्मद ईसरार खान (37) या अट्टल सोनसाखळी चोराला पकडण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. तो खारघरमधील शिल्प चौकातून एका महिलेचे दागिने खेचून पळून जात असल्याचे समजल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष भोकरे व पोलीस शिपाई लवकुश शिंगाडे या दोघांनी त्याचा पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.

या आरोपीच्या अटकेमुळे खारघरसह नवी मुंबईत इतर ठिकाणी झालेले अनेक चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सोनसाखळी चोराला पकडणार्‍या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांत वाढ झाली होती. मागील आठवड्यात तर चेन स्नॅचिंग करणार्‍या लुटारुने दोन दिवसांमध्ये चार महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेले होते. त्यामुळे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक थारकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने चेन स्नॅचिंग करणार्‍या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यावरुन त्याचा शोध सुरु केला होता. यादरम्यान आरोपी मोहम्मद ईसरार खान हा खारघरमधील शिल्प चौकातून एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला होता. हा प्रकार त्या भागात गस्त घालत असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष भोकरे व पोलीस शिपाई लवकुश शिगांडे यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ चेनस्नॅचिंग करणार्‍या या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. या वेळी आरोपी मोहम्मद ईसरार खान हा मोटारसायकवरुन पळून जात असल्याचे निदर्नास आल्यानंतर त्याच्या मागावर असलेल्या दोघा पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन अखेर त्याला जेरबंद केले. या वेळी त्याच्याजवळ त्याने लुटलेली सोन्याची चेन आढळून आल्यानंतर त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply