कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील मुंबईपासून सर्वांत जवळ असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सेवेसाठी असलेले घोडे संकटात आहेत. त्यांना चारा आणि खुराक ही अत्यावश्यक असलेली वैरण संपली आहे. त्यामुळे घोड्यांची सुरू असलेली उपासमार लक्षात घेऊन अश्वपाल जानू ढेबे यांच्या पुढाकाराने एक एनजीओ पुढे आले आहे. दरम्यान, या एनजीओने सलग तिसर्या टप्प्यात घोड्यांसाठी चारारूपी खाद्य उपलब्ध करून दिले आहे. माथेरानमध्ये पर्यटकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात घोडे असून त्या घोड्यांच्या माध्यमातून 400 कुटुंबे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. माथेरानमध्ये लॉकडाऊन असून या लॉकडाऊनमुळे माथेरानमध्ये बाहेरून कोणीही येत नाही. परिणामी माथेरानमधील पर्यटन व्यवसाय 100 टक्के ठप्प झाला आहे. ही बाब लक्षात घेता घोड्यांकडून होणारा व्यवसाय बंद आहे आणि त्यामुळे घोड्यांना दररोज द्यावा लागणारा चारा देणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे 400हून अधिक घोड्यांची उपासमार चालली होती. त्यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हात पुढे आले असून चारा खाद्याची मदत होत आहे, पण घोड्यांची भूक लक्षात घेता त्यांना दररोज खुराक देणे अश्वपालकांना शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमधील अश्वपालक जानू ढेबे यांनी आपल्या ओळखीच्या माध्यमातून एक एनजीओ गाठली आणि त्यांना माथेरानमधील घोड्यांची माहिती दिली. त्या संस्थेच्या माध्यमातून माथेरानमधील घोड्यांसाठी खाद्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोनाचे संकट आणि माथेरानमध्ये वाढलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन माथेरानमध्ये व्यवसाय करणार्या घोडेवाल्यांनी जानू ढेबे यांच्याकडे एनजीओकडून मदतीची मागणी केली होती. जुम्मापट्टी, आसल, धनगर तप्पा, लव्हाळी, नेरळ, भडवळ, धोत्रे, खैराट, दाम खिंडी, वाघेश्वर, दामत, जाधव वाडी या गावांतील अश्वपालकांनी मागणी केली होती. त्यानुसार माथेरानमध्ये येऊन व्यवसाय करणार्या अश्व मालकांना एनजीओ संस्थेचे सदस्य तसेच सचिन ढेबे, नरेंद्र ढेबे यांच्या उपस्थितीत अश्वपालकांना 50 किलोच्या 100 गोणी भुसा हे खाद्य वाटप करण्यात आले.