Breaking News

कोरोनामुळे साडी विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

पनवेल : बातमीदार

एप्रिल-मे महिना हा लग्नसमारंभाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये साड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या संख्येने महिलांची गर्दी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे साडी विक्री करणार्‍यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कामगारांचे पगार देखील थकले आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात साडी विक्री करणार्‍यांनी दुकाने थाटली आहेत. काहींनी आपले गाळे भाड्याने घेतले आहेत तर काहींचे स्वतःचे गाळे आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे साडीची दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत. एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पाडली जातात. कोरोनामुळे यावर्षी जमलेली लग्न रद्द करण्यात आलेली असून ती दिवाळीनंतर किंवा पुढच्या वर्षी करण्यात येणार आहेत. पनवेल शहरात तसेच कामोठे खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी आदी परिसरात साड्यांचे मोठ मोठे शोरूम्स उभारण्यात आले आहेत. अगदी 200 रुपयापासून लाखो रुपयाच्या साड्या देखील या ठिकाणी विक्रीस ठेवण्यात आलेल्या होत्या. वेगवेगळ्या डिझाइन्स तसेच नवीन पद्धतीच्या पैठणी, शालू, नववारी, सहावारी साड्या, लहान मुलांचे कपड़े या दुकानात विक्रीस ठेवलेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे साडी विक्रेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. काही विक्रेत्यांनी नव्यानेच साडी विक्रीची दुकाने सुरू केली होती. त्यांचे मोठे नुकसान या काळात झाले आहे. पावसाळ्यात साडी विक्री कमी प्रमाणात होत असते.  दिवाळीनंतर खरी साडी विक्रीला सुरुवात होते. त्यात लग्नाचा सीझन म्हटला की महिला मोठ्या प्रमाणावर साडी घेण्यासाठी दुकानात गर्दी करतात. मात्र या वर्षी साडी विक्रेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलेले दिसून येत आहे. ऐन सीझनच्या वेळीच कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका साडी विक्रेत्यांना बसलेला आहे.

कोरोनामुळे जागतिक मंदी आलेली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. मार्च ते मे या दोन तीन महिन्यांत जो व्यापार व्हायला हवा होता तो झालेला नाही. तो सर्व व्यापार ठप्प आहे. गाळ्याचे भाड़े, कामगारांचे पगार देखील थकलेले आहेत. ते कसे द्यायचे. शासनाने या गोष्टीचा विचार करावा.

-शरद शेळके, संचालक, द्वारकादास श्यामकुमार साडी सेंटर, पनवेल

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply