Breaking News

महाड-रायगड मार्गावर अपघात; तरुण जागीच ठार, आई जखमी

महाड : प्रतिनिधी

महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला, मात्र महामार्गावर सुरू असलेल्या वाहन तपासणीत संशय आलेले वाहनच अपघातातील असल्याचे उघड झाले. वाहनचालकाला महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाड तालुक्यातील नाते गावाजवळ किल्ले रायगड पाहून येणार्‍या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच-12,एनएक्स-4300) आणि महाडकडून कोंझर गावाकडे जाणार्‍या दुचाकीमध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार संदीप मारुती पवार (36) हा तरुण जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची आई मालती पवार (55) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. देवीची ओटी भरण्यासाठी  संदीप हा अ‍ॅक्टिव्हाने आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला. यातील टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने अपघात झाल्यानंतर घाबरून तत्काळ पळ काढला, मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्लीजवळ पोलीस पथकाला या अपघातग्रस्त वाहनाला ओळखण्यात यश आले. वाहन तपासणी करत असताना टेम्पो ट्रॅव्हलरच्या डाव्या बाजूला बंपर आणि हेडलाइट तुटल्याचे दिसून येताच पोलिसांनी चौकशी केली, मात्र दगडाला गाडी ठोकल्याचे चालकाने सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने एक बाइक येऊन आदळल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच दरम्यान महाड शहर पोलिसांनी एक वाहन बाइक अपघात करून पळून गेल्याचे कळवताच टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस पथकाचे डॉ. वाय. एम. गायकवाड यांनी दिली. या पथकात हेडकॉन्स्टेबल एच. सी. चव्हाण, आर. एम. पवार यांचा समावेश होता.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply