Breaking News

महायुती अभेद्य! : मुख्यमंत्री विरोधकांनी कितीही काडी केली तरी सगळे सोबत

औरंगाबाद : प्रतिनिधी

भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. 24 तारखेला कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून, तुम्ही कितीही काडी केली तरी सगळे सोबत राहणार आहेत, असा टोला लगावला.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने दिली. 70 हजार कोटींची कर्जमाफी केली असे शरद पवार सांगतात, पण महाराष्ट्रात फक्त चार हजार कोटी रुपये दिले, हे ते सांगत नाहीत. 15 वर्षांत फक्त एकदा दिले, तर डांगोरा पिटतात, पण आता तर दरवर्षी 70 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणे आणि जनतेला त्याचा सुगंध देणे ही आपली जबाबदारी आहे, असं आवाहन त्यांनी युतीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केले. आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडे घातले आहे, पडणार ते नक्कीच, असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला.

– खोतकरांची माघार; दानवेंचा मार्ग मोकळा

जालना येथून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असणारे शिवसेना नेते व मंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे जालन्याचा तिढा सुटला असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे खोतकर यांनी औरंगाबादमधील युतीच्या मेळाव्यात जाहीर केले. मी युतीचे काम करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन, असे ते म्हणाले. औरंगाबाद येथे झालेल्या युतीच्या मेळाव्याआधी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली या बैठकीत खोतकर यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना यश आले. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खोतकर म्हणाले की, मी कडवट शिवसैनिक आहे. दगाफटका करणार नाही. रावसाहेब दानवेंना जिंकून आणू.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply