Breaking News

राज्यात मतदारांना रंगीत ओळखपत्र

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून, अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. उर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते, परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवे ओळखपत्र केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात ओळखपत्र देण्यात येते. मतदाराच्या नावात, पत्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे.

-असे आहे ‘पीव्हीसी’चे स्वरूप नव्या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग, विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्याने बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. असे कार्ड मिळाले नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा, तसेच निवडणूक आयोगाच्या 1950 या टोल फ्री क्रमांकावर ओळखपत्रासंबंधी मार्गदर्शन केले जाते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply