उरण : प्रतिनिधी
कोरोना व्हायरसने सपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले असून त्यामधून भारत देशही सुटला नाही. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. आजघडीला राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12
हजारांपेक्षा अधिक आहे. 42 दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपला असला आणि 4 ते 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी तिसर्या टप्प्याच्या पर्वातही मंदिरांचे, प्रार्थनास्थळांचे दरवाजे मात्र अजूनही लॉकडाऊनच राहिले आहेत. परमेश्वराची अनेक रूपे आणि अवतार आपण पहिले, ऐकले पण आज कोरोना व्हायरसच्या महामारीत मंदिरांची आणि प्रार्थनास्थळांची प्रवेशद्वारे बंद असली तरी सर्वधर्मियांच्या इच्छित देवदेवतांनी बंदिस्त राहणे पसंत न करता डॉक्टर व पोलिसांच्या रूपात भक्तगणांना जे दर्शन दिले त्याला
तोड नाही. केंद्र सरकारने कोरोनाग्रस्त राज्यांची आणि शहरांची विभागणी प्रामुख्याने ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये केली आहे. याव्यतिरिक्त कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्याने सील करण्यात आलेले स्पेशल झोन या चारही झोनमध्ये अनेक व्यवहारांना बंदी आहे. राज्य सरकारने प्रामुख्याने ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये अनेक व्यवहारांना काही अटी-शर्थींवर परवानगी दिली आहे. या परवानगीमध्ये पान, तंबाखू आणि दारूची दुकाने सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी असली तरी सरस्वतीचे मंदिर, शाळा-कॉलेजेस, विविध मंदिरे आणि प्रार्थनास्थळे मात्र बंद ठेवण्यात आली आहेत.