खालापूर ः प्रतिनिधी
दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात येते. यावर्षी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुधीर मोरे यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. सुधीर मोरे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 29 जानेवारी 1999पासून ते पोलीस दलात कार्यरत असून अलिबाग, वडखळ, पेण येथील सेवेनंतर आता खोपोली येथे कार्यरत आहेत. प्रदीर्घ सेवेचा अनुभव व उल्लेखनीय कामाची नोंद घेऊन त्यांना गौरविण्यात आले. 1 मे रोजी खोपोली पोलीस स्टेशन येथे खालापूर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी पदक देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व निवडक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कर्तव्यनिष्ठ सुधीर मोरे यांच्या गौरवाबद्दल खालापूर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.