Breaking News

भारतमाला योजनेतून पर्यटन मार्ग महाबळेश्वर-पोलादपूर-दापोलीला जोडणार

महाड : प्रतिनिधी

कोकणातील पर्यटनाला व पर्यटन व्यवसायांना चालना मिळावी यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली या महामार्गाची उभारणी भारतमाला योजनेतून केली जाणार आहे. तसे प्रशासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. याच धर्तीवर आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड-मढेघाट-पुणे या पर्यटन मार्गासाठीही प्रयत्न होत असून, महाडकरांची ही मागणीदेखील लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

महाडचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी महाबळेश्वर-पोलादपूर व्हाया रेवतळे विसापूर दापोली असा पर्यटन महामार्ग होण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले होते. त्याला यश आले आहे. आमदार दरेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच या महामार्गाच्या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यात येत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव यांनी त्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

या महामार्गाच्या निर्मितीने महाबळेश्वर आणि दापोली ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची पर्यटनस्थळे करंजाडी रेल्वेस्थानकाने जोडली जाणार आहेत, तसेच पोलादपूर आणि महाड या तालुक्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रयत्नाने होणार्‍या महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली महामार्ग आणि महाड-मढेघाट-पुणे या पर्यटन मार्गांच्या निर्मितीमुळे वाई, महाबळेश्वर, पोलादपूर, दापोली, महाड, वेल्हे येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

निसर्गाचे भरभरून लेणे लाभलेल्या कोकणात अनेक पर्यटनस्थळे आहेत, परंतु दळणवळणाच्या पर्याप्त सुविधा नसल्याने अनेक ठिकाणी जाणे जिकिरीचे होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रगतिपथावर; तर काही नियोजनात आहेत. या क्षेत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत जोमाने काम करीत आहेत. केवळ जमिनीवरच नव्हे; तर समुद्रातही प्रयोग करून वाहतूक सुकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने कोकणात अनेक मार्गांची कार्यवाही सुरू असून, महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली महामार्ग त्याचाच भाग आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply