Breaking News

पनवेलमध्ये घरगुती गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरसंदर्भात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे, मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅसवर कोणतेही निर्बंध नाहीत आणि गॅसचा तुटवडाही नाही, असे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
सध्या व्यावसायिक गॅसवर काही निर्बंध लागू करण्यात आले असले तरी घरगुती गॅसच्या वापराबाबत कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तरीही काही टीव्ही वाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण आवश्यकता नसतानाही गॅस एजन्सींवर रांगा लावत आहेत. त्यामुळे अनावश्यक घबराट वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संदर्भात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व स्थानिक प्रतिनिधींना त्यांच्या विभागातील गॅस वितरकांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका अस्मिता जगदीश घरत तसेच युवा नेते अतुल घरत यांनी तातडीने गॅस वितरण एजन्सीला भेट देऊन आढावा घेतला. या सर्वांशी चर्चा केल्यानंतर घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नसल्याची माहिती समोर आली आहे तसेच अधिक सतर्कतेच्या दृष्टीने तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरगुती गॅससंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी आपल्या भागातील भाजप कार्यालय, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत निश्चितपणे केली जाईल, असे आश्वासनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.
दरम्यान, गॅस वितरण एजन्सीनेही घरगुती गॅस तुडवडा नसल्याचे स्पष्ट करून अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

Check Also

पनवेल पंचायत समिती सभापतीपदासाठी भाजपच्या रंजना वास्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय …

Leave a Reply