व्यापार्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहे ः प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी, स्वच्छता, जनजागृती, साफसफाई अशी कामे युध्दपातळीवर सुरू आहेत, परंतु हा आठवडा कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगर परिषद टीमने नागरिकांना संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला नागरिकांनी व व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैद्यकीय सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. फक्त पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोह्यात 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत शहरातील औषध दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रोहे अष्टमी नगर परिषदेने घेतला आहे.
माणगावात कडकडीत बंद; पोलीस बंदोबस्त
माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या जोखडातून नागरिकांना मुक्ती मिळावी यासाठी माणगावमधील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने सलग तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला. गुरुवार दि. 2 एप्रिल ते शनिवार दि. 4 एप्रिलपर्यंत असे सलग तीन दिवस अत्यावश्यक सेवा, रुग्णालये व औषधांची दुकाने वगळून पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. माणगावकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद पाळला. माणगाव उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.