Saturday , March 25 2023
Breaking News

एसटी महिला वाहकांचा नव्या गणवेशाला विरोध

पेण : प्रतिनिधी : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेष धारण करून तिकीट वाटपाची कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा ‘विदुषकी’ गणवेश घालून कामगिरी करताना महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश होता. या खाकी गणवेशामुळे महिला वाहकांना आदर, सन्मान मिळत होता. खाकी गणवेश धारण करून कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना सुरक्षित वाटत होते. जनसामान्यात खाकी गणवेशाबद्दल असलेला आदर या महिलांना प्राप्त होत होता, परंतु आता नवीन गणवेशाची प्रतवारी, त्याचा रंग व ग्रामीण भागात असा पेहराव हा महिला वाहकांच्या आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणारा आहे. त्यामुळे या नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी असून ‘मेरी खाकी नही दुंगी’ अशी भूमिका महिला वाहकांनी घेतली आहे. हा नवीन गणवेश ठरविताना काही मोजक्याच प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अनेक असुविधा निर्माण होत असल्याची भावना महिला वाहक व्यक्त करीत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील अनेक विभागातील महिला वाहकांनी नवीन गणवेशाऐवजी पूर्वीच्या खाकी गणवेशच द्यावा, असा विनंती अर्ज राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना केला आहे. दरम्यान, राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना महिला वाहकांना खाकी गणवेश पूर्ववत देण्यात यावा, बस स्थानकात, आगारात सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविण्यात यावे व महिला कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महिला वाहकांनी स्वाक्षरी करून दिलेले आहे.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply