समूह संपर्कासाठी मागणी वाढली; विविध अॅप्सचा वापर
माणगाव ः प्रतिनिधी – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व संपर्काची विविध साधने बंद झाली आहेत. या संपूर्ण लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिक आपापल्या घरी असून कार्यालये, नोकरीचे ठिकाणे बंद आहेत. जाणे-येणे, पाहुणचार पूर्णपणे बंद आहे. अनेक आस्थापना, कार्यालयांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. या काळात एकमेकांना संपर्कासाठी, सामाजिक, संस्थांच्या शैक्षणिक नियोजनात्मक बाबी ठरविण्यासाठी व घरगुती नातेवाइक, मित्रमैत्रिणींशी संपर्क करण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक जणांशी एकाच वेळेस संपर्क केला जात असून यासाठी कॉन्फरन्स कॉल्स व समूह कॉल्सना चांगले दिवस आले आहेत.
अनेक जण कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क करीत असून एकमेकांच्या संपर्कात राहत आहेत. यासाठी झूम अॅप, मोबाइलमधील सुविधा आदींचा वापर केला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात या प्रगत संपर्क साधनांचा उपयोग होत असून शासकीय कार्यालये व सामाजिक संस्था तसेच घरगुती संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
लॉकडाऊन काळात बाहेर जाण्या-येण्यास बंदी आहे. एकमेकांना भेटता येत नाही. त्यामुळे संपर्क कमी होत आहे. यावर उपाय म्हणून घरगुती संभाषण व मित्र परिवाराशी, कार्यालयीन कामासाठी कॉन्फरन्स कॉलचा चांगला उपयोग होत आहे. एकाच वेळेस अनेक जणांशी याद्वारे संपर्क होत असून वेळेची बचत होऊन माहितीची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होत आहे.
-हेमलता आखाडे, शिक्षिका