नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कबुतरांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड येथील अनेक नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळल्याची माहिती समोर येत आहे.
आयुक्त गणेश देशमुख पनवेलकरांच्या आरोग्यासाठी जनजागृती करताना दिसतात. पनवेल व तळोजा-कळंबोली, कामोठे, खारघर येथे नागरी वस्तीत वाढ झाली. नवीन इमारतींच्या संख्येतही वाढ झाली. यासोबतच कबुतरांच्या संख्येतही वाढ झाली. कबुतरांच्या विष्टेचा आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी तेरणा हॉस्पिटलचे डॉ. अभय उप्पे म्हणाले, कबुतरांच्या पंखातील फिदर डस्टमुळे फुप्फुसाचे आजार बळावतात. लहान मुले, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असते. कबुतरांची विष्टा संपर्कात आल्यास अॅलर्जीचे प्रमाण वाढते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.