विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास
रोहे, धाटाव : प्रतिनिधी
भाजपच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्राचा सर्वाधिक निधी ग्रामपंचायतीकडे येणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच नेतेगण महाराष्ट्रासह कोकणात विविध विभागांत ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोकणासह महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्रित आले आहेत.असे असले तरी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप असणार असून, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक भाजपचेच सदस्य व सरपंच निवडून येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. दक्षिण रायगडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकीच्या पूर्वी कोलाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, सरचिटणीस सतीश धारप, मिलिंद पाटील, कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, सुधागड तालुका अध्यक्ष राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, सरचिटणीस संजय लोटणकर, ज्येष्ठ नेते तानाजीआप्पा देशमुख, अॅड. दीपक पडवळ आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. तिन्ही पक्षांत विसंवाद आहे. विविध विषयांवर सातत्याने मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीपासून औरंगाबादचे संभाजीनगर या नामांतरावर आमची भूमिका ठाम असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांची भूमिका उशिरा जाहीर केली, परंतु त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र या विषयावर काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या विषयावर एकमत होतील का हे लवकरच स्पष्ट होईल. महत्त्वाचे म्हणजे या विषयावर तिन्ही पक्षांचे एकमत होत नाही, परंतु स्वार्थासाठी मात्र हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करीत आहेत.
हे सरकार दुर्घटनाग्रस्त सरकार आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. भंडारा जिल्ह्यातील झालेली घटना सरकारला लाजिरवाणी आहे. या रुग्णालयाने दुरुस्तीचा सरकारला प्रस्ताव दिला होता, परंतु शासनाकडे प्रलंबित राहिला. त्यामुळे या रुग्णालयात दुरुस्ती होऊ शकली नाही. महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक रुग्णालयांचे फायर व सेफ्टी ऑडिट राज्य सरकारने करावे, अशी आमची मागणी आहे. आम्ही महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांतील माहिती घेणार आहोत. याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, असेही दरेकर म्हणाले.
रायगडातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक रुग्णालयात मशिनरी सुस्थितीत आहेत का, तज्ज्ञ डॉक्टर आहेत का या सर्वांचा आढावा घेऊन आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे रुग्णालय सुस्थितीत आणण्यासाठी मागणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. रायगडात भाजपचे काम वाढत असून टप्प्याटप्प्याने भाजप पक्ष वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.