पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकर्यांचे द्रष्ट नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्ताने बुधवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025चे बक्षीस वितरण; शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ; त्याचबरोबर मराठी पाऊल पडते पुढे हा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अनिल भगत, प्रकाश भगत, संजय भगत, सभासद वसंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
स्व. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवत फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्य्र व भुकेने हवालदिल लोकांबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतो हे त्यांनी जाणले होते. दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी; त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या अंतःकरणात कायम होती. त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. त्याचबरोबर देवदूताची भूमिकासुद्धा बजावत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे भगतसाहेबांची कीर्ती अजरामर राहिली आहे.
स्व. भगतसाहेबांंची जयंती फेब्रुवारी लीप महिन्यामुळे दर चार वर्षांनी असते. त्या वेळी जयंतीनिमित्त राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीला त्यांच्या नावे बहुमानाचा पुरस्कार दिला जातो, तर दरवर्षी पुण्यतिथीलाही सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत भगतसाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाते. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व असते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper