Breaking News

पनवेल बसस्थानकात सॅनिटायझरची फवारणी

पनवेल : एसटी बस वाहतूक सुरू झाल्याने शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सर्व वाहनांवर आणि बसस्थानकात सॅनिटायझरची फवारणी केली. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या एक हजारपार

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत शुक्रवारी 74 रुग्ण सापडल्याने बधितांची एकूण संख्या 1048 झाली आहे. गेले आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमवार आला होता, मात्र गुरुवार व शुक्रवारी लागोपाठ पुन्हा त्यात वाढ झालेली दिसून आली. विभागवार आकडेवारी लक्षात घेतल्यास  बेलापूर 2, नेरुळ 18, वाशी 4, तुर्भे 14, कोपरखैरणे 19, घणसोली 13, ऐरोली 2 व दिघा 2 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

सिप्ला कंपनीकडून मदतीचा हात

रसायनी : रामप्रहर वृत्त

सिप्ला लिमिटेडने शुक्रवारी पाताळगंगामधील कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची घोषणा केली. कंपनीने नुकतेच संकटाचा सामना करण्यासाठी देशाला आवश्यक असलेल्या विविध त्वरित व दीर्घकालीन बचावकार्यासाठी 25 कोटी रूपयांचा ’केअरिंग फॉर लाइफ’ कोविड-19 समर्पित फंड उभारला. पाताळगंगामध्ये कंपनी सरकारच्या कोविड-19 व्यवस्थापन प्रयत्नांना साह्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सहयोगाने काम करत आहे. सिप्लाचे उपक्रम प्रामुख्याने त्यांचे कर्मचारी, विक्रेते, कंत्राटदार कर्मचारी, प्रत्यक्ष आघाडीवर काम करणारे प्रशासन व आरोग्यसेवा कर्मचारी, तसेच मूलभूत गरजा कमी प्रमाणात उपलब्ध होणार्‍या समुदायाच्या व्यक्तींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहेत.सिप्ला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यांसोबत सहयोगाने काम करत त्यांच्या आवश्यक गरजा जाणून घेत आहे. याकरिता कंपनी खालापूर, वडगाव व माझगाव ग्रामपंचायतींमधील तहसीलदार कार्यालयासारख्या विविध भागधारकांना, तसेच रसायनी, खोपोली, कर्जत, पेण, पनवेल व खालापूरमधील पोलीस स्टेशन्समध्ये मास्क्स व सॅनिटझर्सचा पुरवठा करत आहे. रायगडमधील जिल्हा आरोग्य अधिकारीकडे नाकावरील मास्क्स व इन्फ्रारेड गन देखील सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणून आतापर्यंत अंदाज 13,000 नोज मास्क्स व 90 सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले आहे. समुदायाप्रती जबाबदारीमध्ये अधिक वाढ करत सिप्ला कंपनीच्या कारखान्याजवळील परिसरामध्ये राहणा-या व्यक्तींना औषधे, फूड पॅकेट्स, सॅनिटायझर्स, मास्क्स व ग्लोव्ह्ज अशा आवश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे.

स्थानिक व परगावाहून परतणार्‍यांमध्ये वाद

पेण : प्रतिनिधी

कोरोना विषाणूमुळे होणारा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने शासनाने केलेल्या उपाययोजना या उपाययोजनांचे पालन होत नसल्यामुळे परगावाहून आलेल्या व्यक्ती व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण होऊ लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 24 तास कार्यरत राहुन शर्थीचे प्रयत्न करणार्‍या जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर आता कोरोनामुळे निर्माण झालेले तंटे सोडविण्याची आणखी एक जबाबदारी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात तालुक्याच्या बाहेरून येणार्‍या नागरिकांना ग्रामीण भागामध्ये प्रवेश निषेध केला आहे. त्यामुळे येणारे नागरिक आणि स्थानिक यांच्यामध्ये मोठा वाद होऊन विकोपाला जात आहे. जरी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असले तरी मुंबई, ठाणे या शहरांतून गावाकडे येणारे नागरिक स्थानिकांबरोबर हुज्जत घालून वाद निर्माण करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार बाहेरुन  येणार्‍या नागरिकांना होमक्वारंटाइनचे शिक्के मारुन शाळा, समाजमंदिर यामध्ये पुढील 14 दिवस ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, शहराकडून येणारी मंडळी ही वाद घालत आहेत. त्यामुळे कळत नकळत ग्रामीण भागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे.

श्रीवर्धनहून 69 मजुरांची मूळ गावी रवानगी

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधून 69 मजूर प्रवाशांना घेऊन तीन एसटी बसेस पनवेल रेल्वे स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्यानंतर पनवेल स्थानकातून विशेष रेल्वे गाडीने या मजुरांची रवानगी त्यांच्या मूळगावी करण्यात येणार असल्याचे बोर्ली मंडलाचे मंडल अधिकारी सुनील मोरे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हे सर्व मजूर श्रीवर्धन तालुका परिसरात अडकून पडले होते. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश येथील 60 आणि झारखंड येथील 9 असे एकूण 69 मजूर कामगार प्रवास करीत आहेत. नियमानुसार प्रत्येक गाडीत एका आसनावर एक याप्रमाणे श्रीवर्धन प्रशासनाने प्रवाशांची विशेष खबरदारी बाळगली असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे एस टी बस श्रीवर्धन आगारातून मार्गस्थ होण्यापूर्वी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या दाखल्याच्या आधारे त्यांना प्रवासासाठी प्रमाणित करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply