दोन गायी, एक कुत्रा मृत्युमुखी; दोन गायींसह वासराला वाचविण्यात यश
कर्जत ः बातमीदार
लॉकडाऊन काळात नेरळ गावात मुक्या प्राण्यांना फॉरेट कीटकनाशक खायला घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेतून दोन गायी आणि एका वासराला वाचविण्यात प्राणिमित्रांना यश आले असून दोन गायी आणि एका कुत्र्याचा मात्र हकनाक बळी गेला आहे. दरम्यान, नेरळ गावातील प्राणिमित्रांनी वेळेवर धाव घेऊन दाखवलेल्या समयसूचकतेमुळे तीन मुक्या प्राण्यांचा जीव वाचला आहे.
नेरळ गावातील पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या मैदानात काही जनावरे बेशुद्ध होऊन पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नेरळ गावातील प्राणीमित्र गणेश परब, श्रीहरी काळे, प्रज्ञेश खेडकर हे त्या ठिकाणी रात्री पोहचले. त्यानंतर तेथे तोंडाला फेस येत असलेल्या अवस्थेत चार गायी, एक वासरू आणि एक कुत्रा पडलेला दिसून आला. त्या तरुणांनी जवळच असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधला. त्या ठिकाणी सेवेत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील हे आपले कर्मचारी कांबळे आणि कुटे यांना घेऊन त्यांच्यासोबत त्या मैदानात पोहचले. तेथे बेशुद्धावस्थेत पडलेल्या गायींची तपासणी केली असता त्या सर्व प्राण्यांच्या तोंडाला येत असलेला फेस पाहून हा फॉरेट कीटकनाशक प्राशन केल्याने आल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी आपले सर्व प्रयत्न पणाला लावून दोन गायी आणि एक वासरावर औषधोपचार करून त्यांचा जीव वाचवला. या कामी रोहित राणे, गणेश शेळके यांनीही मोलाची मदत केली.
रात्रीच्या अंधारात आणखी तीन प्राण्यांनी फॉरेट कीटकनाशक प्राशन केले होते. त्यातील दोन गायी आणि एक कुत्रा हे अन्य ठिकाणी बेशद्ध होऊन पडले होते. त्यामुळे त्यांना या प्राणिमित्रांना आणि पशुवैद्यकीय अधिकार्यांना वाचवता आले नाही. डॉ. चौरसिया यांच्या दवाखाना परिसरात एक आणि नेरळ विद्यामंदिर रस्त्यावर एक गाय मृतावस्थेत आढळून आली.
पोस्ट ऑफिसमागील मैदानात एक कुत्रा मृतावस्थेत आढळून आला. त्याची माहिती नेरळ ग्रामपंचायतीस दिली आली असता नेरळ ग्रामपंचायतीचे पथक ट्रॅक्टर आणि टेम्पो घेऊन त्या ठिकाणी पोहचले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच शंकर घोडविंदे हेदेखील तेथे पोहचले. मृत जनावरांना उचलून अन्यत्र त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.