झटपट कामे करण्यास शेतकर्यांची पसंती
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनला 50 दिवसांहून अधिक दिवसांचा काळ लोटला आहे. या दिवसांत शेतीसह अनेक कामे रखडली आहेत.शेतीकामांसाठी शेतकर्यांना सामाजिक दुरावा राखत काम करण्याची मुभा मिळाली आहे, मात्र पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लॉकडाऊनमुळे रखडली आहेत. त्या अनुषंगाने शेतकर्यांकडून आता यंत्रांचा आधार घेत झटपट कामे करण्यास पसंती दिली जात आहे.
लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे पूर्ण करण्यावर आता शेतकर्यांनी भर दिला असून अगोटीपूर्वी शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. शेतीच्या कामात बांधबंदिस्ती, शेत सफाई ,तरवे भाजणी, कुंपण आदी बाबी पूर्ण करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. अवकाळी पडणारा पाऊस व जून महिन्यात वेळेवर पाऊस पडेल या अंदाजाने शेतकरी कामांसाठी ट्रॅक्टर व इतर यंत्रांचा वापर करीत आहेत, जेणेकरून कामे वेळेत पूर्ण होतील. परिणामी वेळ व श्रम वाचतील. लॉकडाऊनमुळे मजूर मिळण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देत आहेत. तासाला 500 रुपये मजुरीवर ट्रॅक्टर मिळत असून शेतकरी शेतीची कामे यांत्रिक पद्धतीने करीत आहेत.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच लॉकडाऊनमुळे शेतीची बरीच कामे शिल्लक आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने बांधबंदिस्ती व इतर कामे केली जात आहेत. यामुळे आमचे श्रम आणि वेळही वाचत आहे.
-विकास यादव, शेतकरी, माणगाव