रेवदंडा ः प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी कोर्लईचे सरपंच, शिवसेना कार्यकर्ते म्हणतात इथे बंगले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणत आहेत की माझे बंगले आहेत. खरे कोण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे? असा सवाल करीत याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते शुक्रवारी (दि. 18) कोर्लई व रेवदंडा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी कोर्लई गावातील ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. त्यांच्यासमवेत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात सोमय्यांनी ग्रामसेवकांना पत्रक दिले. त्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली. या संदर्भात बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, कोर्लई ग्रामपंचायत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधित्व करीत आहे. सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाहीत, पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. मग नेमके खरे काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज इथे आलो. ग्रामसेवकांना सर्व कागदपत्रे दिली. त्यांनी आम्हाला सांगितले की, बंगले अधिकृत होते. आज जी काही परिस्थिती आहे ती तुम्हाला दोन दिवसांत कळवतो. सत्तेसाठी, सत्तेपोटी सरपंच सांगतो बंगले आहेत. पुन्हा तोच सरपंच दोन तासांनी बंगले नाहीत असे सांगतो. दोन तासांच्या अवधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगले गायब केले काय? असा सवाल करून खरे काय, खोटे काय याच्या तपासाची मागणी करीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून देणार, असे सोमय्या यांनी म्हटले. राज्य सरकारचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत, पण हे माफिया सरकार पैशांसाठी काम करतंय, माफियासेनेच्या मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे कंत्राट बोगस संजय राऊतच्या पार्टनरच्या कंपनीला दिले. माफियासेनेची वरची कमाई बंद होत आहे. म्हणून त्यांचा आक्रोश सुरू आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
‘19 बंगल्यांची कागदपत्रे खोटी असल्याचे राज्य सरकारने सिद्ध करावे’
अलिबाग ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावात खरेदी केलेल्या 19 बंगल्यांची जी कागदपत्रे माझ्याकडे आहेत ती खोटी असल्याचे राज्य सरकारने सिद्ध करावेत. हे 19 बंगले कोणत्या कायद्याने कागदावरून काढून टाकले ते दाखवावे, असे आव्हान भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या शुक्रवारी रायगडमध्ये आले होते. ते प्रथम कोर्लई ग्रामपंचायतीत गेले. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी अलिबाग येथे येऊन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते सोबत होते. जिल्हाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या पत्रकारांशी बोलत होते. रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगलेच नाहीत, तर मग टॅक्स का भरला? हे बंगले जमिनीवरून तसेच कागदावरूनदेखील अदृश्य करण्यात आले आहेत. बंगले कागदावरून काढून टाकण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे, सरकारला आहे असे जिल्हाधिकारी सांगतात. हा अधिकार कोणत्या कायद्याने त्यांना मिळाला हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे किरीट सोमय्या म्हणाले. 19 बंगल्यांचे गूढ वाढत चालले आहे. हे बंगले कसे अदृश्य झाले ते स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट करावे, असे म्हणत खासदार संजय राऊत माझ्यावर व माझ्या मुलावर जे आरोप करतात त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. कोविड सेंटरमधील घोटाळा प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी राऊत आमच्यावर आरोप करीत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper