Breaking News

आदिवासी बांधवांचा घसा कोरडाच!

पनवेल तालुक्यातील वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या

पनवेल : बातमीदार

लॉकडाऊनमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवरील आदिवासीच्या घरी धान्य नाही की पिण्यासाठी पाण्याचा थेंब नाही. पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना वणवण भटकावे लागत आहे. काही वाड्यांवर अन्न धान्य पोहोचले आहे. मात्र पिण्यासाठी पाणी नसल्याने आदिवासी बांधवांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र पनवेल परिसरात दिसून येत आहे. जिल्हा परिषदेने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासींकडून केली जात आहे. 

तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसरात कुंबलटेकडी, धामनी, चिंचवाडी, कोंडीची वाडी, सतीची वाडी, तर मोरबे परिसरात येरमाल, गारमाल, भल्याची वाडी, यासारख्या अनेक वाडया आहेत. एप्रिल-मे महिन्यात या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. त्यामुळे येथील आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना विशेष करून महिलांना डोंगर कपार्‍या पार करून जवळपास एक ते दीड किलोमीटर पायी प्रवास करून हंडाभर पाण्यासाठी चालत जावे लागते. आदिवासी वाड्यांवरील महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरलेला दिसून येत नाही. नानोशी येथे देखील विहिरीची पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे वाड्यांवर अन्नधान्याची व्यवस्था झाली पण पिण्याच्या पाण्याचे काय असा प्रश्न त्यांना सतावत आहे. नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे नेहमीची होते पाणीटंचाई अशी परिस्थिती काही आदिवासी वाड्यांवर आहे. मे महिना उजाडून काही दिवस उलटून गेले आहेत उन्हाचा प्रभाव वाढत चाललेला आहे.  37 ते 38  डिग्री सेल्सिअस उन्हामुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत चाललेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी कडून केली जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply