उरण : बातमीदार
उरण तालुक्यातील करंजा येथे शंभरहून कोरोना रुग्ण आढळल्याने गावाचे कामकाज ठप्प झाले आहे. सर्वकाही बंद असल्याने ग्रामस्थांच्या भावनांचा शनिवारी (दि. 16) रात्री उद्रेक होऊन जमावाने ग्रामपंचायतीवर धडक देत हल्लाबोल केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच पोलिसांनी ती नियंत्रणाखाली आणल्याने मोठा अनर्थ टळला.
करंजा गावात सुरकीच्या पाड्यातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा फैलाव गावभर होत सध्या शंभरहून अधिक रुग्ण झाले आहेत. यामुळे प्रशासनाकडून गावबंदी करीत सर्व व्यवहारही बंद करण्यात आले. परिणामी धड गावाच्या बाहेर जाता येत नाही, तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद. त्यातच काही पेशंटचे पैसे भरूनही रिपोर्ट नाही, रात्री-अपरात्री पेशंटला नेण्यास येणे, पेशंटची सोय न करणे असे आरोप करीत ग्रामस्थ संतप्त झाले.
या वेळी जमाव मोठ्या संख्येने जमा होऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला. जमावाच्या भावना पाहता हल्लाबोल होण्याची शक्यता होती. याची कुणकुण पोलिसांना लागताच सहाय्यक आयुक्त विठ्ठल दामगुडे, वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती
नियंत्रणात आणली.
आणखी 16 पॉझिटिव्ह रुग्णांची भर
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील करंजा गावात कोरोना संसर्गाने कहर केला असून, आणखी 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे करंजातील कोरोनाबाधितांची संख्या 117 झाली, तर तालुक्याचा एकूण आकडा 127वर पोहचला आहे.
उरणमधील सुरुवातीचे सात रुग्ण ठणठणीत बरे होऊन त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तत्काळ क्वारंटाइन करण्यात आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकली नाही. उरण तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर असताना करंजातील सुरकीचा पाडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर तेथील रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नव्या 16 कोरोना रुग्णांना पनवेल येथील इंडिया बुल्स येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, तर यापूर्वीच्या रुग्णांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सात रुग्ण बरे झाले आहेत.