पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 13 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीणमध्ये नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागानेही कोरोनाच्या रुग्णांची शंभरीपार केली आहे. याशिवाय इतर ठिकाणचे रुग्ण मिळून जिल्ह्याचा एकूण आकडा 518वर पोहचला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल सहा, खारघर चार, कामोठे दोन आणि कळंबोलीतील एका रुग्णाचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात 259 रुग्ण झाले असून, 115 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये कोप्रोली- नेरे आणि पाली देवद येथील प्रत्येकी दोन तसेच शिरढोण, वहाळ, केळवणे, विचुंबे आणि सुकापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल तालुक्यात आता 366 रुग्ण झाले आहेत.
खारघर सेक्टर 10मधील लविस्ता सोसायटीत राहणार्या 32 वर्षीय महिलेला 11 मे रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा 16 मे रोजी मृत्यू झाला. सेक्टर 35मध्ये स्मित हौसिंग सोसायटीत राहणार्या दोन महिलांना कोरोनाची लागण झाली असून, कुटुंबप्रमुखापासून त्यांना संसर्ग झाला असावा. सेक्टर 15मध्ये 13 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे वडील पॉझिटिव्ह आहेत. सेक्टर 10मधील महिलेचे वडील बँक ऑफ इंडियाच्या माजगाव शाखेत काम करीत आहेत. त्यांच्यामुळे तिला संसर्ग झाला.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईपमध्ये सहा रुग्ण आढळले आहेत. यापैकी चार फळविक्रेते असून, त्यांच्यापैकी एकाला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण एकत्र राहत होते. वसंत निवासमधील किराणा दुकान चालवणार्या दोघांना कोरोना झाला आहे. कामोठ्यात राहणारी व ताडदेव पोलीस मुख्यालयात काम करणारी व्यक्ती आणि सेक्टर 10मधील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कळंबोलीत एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारपर्यंत 1873 टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी 259 पॉझिटिव्ह असून, 73 टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आजपर्यंत 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी खारघरमधील दोन आणि कळंबोलीतील एक व्यक्ती पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.
पनवेल ग्रामीणमध्ये नऊ नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये कोप्रोली-नेरे येथील फॉर्च्युन गार्डनमधील एकाच कुटुंबातील दोघांना आणि पाली देवद येथील स्वामी सदन सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय शिरढोण, वहाळ, केळवणे, विचुंबे आणि सुकापूर येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमध्ये एकूण 107 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 27 जणांनी कोरोनावर मात केली असून, 77 जणांवर उपचार सुरू आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे.