
पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे आवाहन
मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन शिथिलतेचा फायदा घेऊन विनाकारण न भटकता बाजारपेठेत चक्रा मारता वाहन फिरविणार्यांवरही कारवाई होताना दिसत आहे. यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक करणाने नटलेला परिसर असून परिसरात मोहोपाडा, रिस व वावेघर बाजारपेठ आहेत.रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या परिसरातील बहुतांशी परीसर येत असून अनेक गावं, वाड्या, वसाहती येतात. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीचे क्षेत्रही मोठे आहे. परंतु रसायनी पोलीस ठाण्याला 52 पोलीस कर्मचारी व सात होमगार्ड, असे पोलीस कुटुंब आहे. सध्या देशात लॉकडाऊन हे 31 मेपर्यंत असून रसायनी परिसरात कोरोनाची घुसखोरी होवू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण रेषेवरील आपटा चेक बुथ, सावले चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, मोहोपाडा चेक बुथवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
रसायनी व आसपासच्या परिसरात कुठेही गर्दी होवू नये यासाठी योग्य नियोजनाचे धडे पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी नागरिकांना दिले आहेत. शिवाय जीवनावश्यक वस्तूपासून कोणीही वंचित राहू नये याकडेही पोलीस यंत्रणा नजर ठेवून आहे.