पनवेल महापालिका बसवणार हाईटगेज; भाजपच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
रोडपाली वसाहत आणि परिसरात रस्त्यावर नागरी वस्तीत अवजड वाहनांचे वाहनतळ बनले आहेत. रस्त्यावर उभ्या केलेल्या अवजड वाहनामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी पनवेल पालिकेकडे हाईटेगेज बसवण्याची मागणी केली होती. यासोबतच परेश ठाकूर यांनी या विभागाचीची पाहणीदेखील केली होती.
कळंबोली येथे असलेला आशिया खंडातील सर्वांत मोठा लोखंड बाजार, जवळ असलेली तळोजा औद्योगिक वसाहत, जेएनपीटी बंदर तसेच कळंबोली येथून मुंबई, गोवा, पुणे ठाणे, नाशिक या ठिकाणी जाण्यासाठीचे जंक्शन असल्थाने सोयीच्या वाहतुकीसाठी कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करत असतात. कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात दररोज हजारो अवजड वाहने मालाची ने-आण करतात, परंतु ज्या प्रमाणात या ठिकाणी वाहणे येतात त्या प्रमाणात या ठिकाणी वाहनतळ विकसित केले गेले नाहीत. सिडकोने वसाहत व लोखंड पोलाद बाजार वसवला, परंतु भविष्याचा विचार करता वाहनतळ उभारायला विसर पडला, तसेच उपलब्ध वाहनतळाला वाहन उभे करण्यासाठी शुल्क भरावे लागत असल्याने वाहनचालक जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास हा रोडपाली वसाहतीला होत आहे. त्यामुळेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर व रविनाथ पाटील यांनी या ठिकाणी अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी हाईटगेजची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पनवेल पालिका तिन ठिकाणी हाईटगेज बसवणार आसून येत्या आठ ते दहा दिवसांत हाईटेगेज बसवले जातील, अशी माहिती पनवेल पालिकेचे अभियंते राहुल जाधव
यांनी दिली.
रोडपाली वसाहतीमध्ये रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने पदपथ आडवले असल्याने येथील महिला लहानमुले व वृद्धांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पालिकेने हाईटेगेज बसण्यास अनकुलता दर्शवली आहे.
-रविनाथ पाटील, अध्यक्ष, भाजप कळंबोली