नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांना करावा लागत आहे. यामध्ये लग्न सोहळे, वाढदिवस, व अन्य समारंभामध्ये असणारा कॅटरिंग व्यवसाय डबघाईला आला आहे. कोरोनामुळे विवाह व अन्य समारंभांवर आलेल्या मर्यादांमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमांतील जेवणाचे मेन्युच गायब झाले आहेत. परिणामी कॅटरिंग व्यवसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामध्ये काम करणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये छोटे मोठे शेकडो कॅटरिंग व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे एक वर्षांपासून अनेकांच्या हाताला काम मिळालेले नाही. यामुळे कॅटरिंगमध्ये भाजी कापण्यापासून ते जेवण वाढण्याचे काम करणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक व्यावसायिकाकडे 25 ते 30 कामगार असतात, मात्र सध्या लग्न समारंभासाठी प्रशासनाने 50 माणसांची अटक घातली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंच पक्वान्नाच्या मेन्यूच्या मिळणार्या ऑर्डर बंद झाल्या आहेत. तर 50 माणसांच्या जेवणासाठी कॅटरिंगला ऑर्डर देण्याचे वधूवर कुटुंबीयांकडून टाळले जात आहे. परिणामी कॅटरिंग व्यावसायिक व त्यावर आधारित कामगार यांच्यापुढील संकट सोडवण्यासाठी नवी मुंबई वेडिंग असोसिएशनमार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन लग्नासाठी 50 व्यक्तींमधून कॅटरिंगचे कामगार वगळण्याची मागणी केली आहे, परंतु लिखित आदेश होत नसल्याने अनेकांना छोटे कामदेखील मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार असल्याचे संघटना अध्यक्ष राजेश गौडा व खजिनदार कैलास मुद्रस यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी कॅटरिंग व्यावसायिकांची बैठक झाली. हॉलव्यतिरिक्त मोकळ्या मैदानात मोठी गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाकडून जे नियमांचे पालन करतात त्यांचीच गळचेपी होत असल्याचा आरोप होत आहे.
कामगारांची उपासमार
कॅटरिंगमध्ये काम करणार्या बहुतांश कामगारांचे हातावर पोट आहे. त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुरुवातीचे काही दिवस व्यावसायिकांनी आर्थिक आधार दिला, मात्र वर्षभर काम नसल्याने कॅटरिंग व्यावसायिक डबघाईला आले आहेत.