Breaking News

‘राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे पनवेलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ’

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्य शासनाच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी प्रदेश अध्यक्ष दिलीप सवणे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई तसेच इतर ठिकाणी काम करणार्‍यांची ते काम करत असलेल्या ठिकाणीच तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शनिवारी (दि. 16 मे) निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पनवेल तालुक्यात आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे सर्व शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, विविध कंपन्या व जास्त करून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहेत. जे मुंबईसारख्या ठिकाणी कामाला आहेत त्यांची काम करत असलेल्या ठिकाणीच निवार्‍याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली तर निश्चितच पनवेल तालुक्यात कोरोनाचा फैलाव होण्यास आळा बसेल.

याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनास 24 एप्रिलला लेखी निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली असून तशी मागणीही केली होती. तसेच नगरसेवक नितीन पाटील यांनीही याबाबत 2 मे रोजी मेलद्वारे निवेदन आपणास दिले होते. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही अथवा सूचना करण्यात आली नसल्याचे कळते. परिणामी असे रुग्ण सातत्याने मुंबई-पनवेल प्रवास करताना त्यांच्या संपर्क प्रादुर्भावाने त्यांचे कुटुंबीय व अन्य नागरिक देखील कोरोनाग्रस्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घेऊन अशा कर्मचारी, कामगार वर्गाला ते काम करत असलेल्या ठिकाणीच राहण्याची/निवार्‍याची व्यवस्था करण्यात यावी जेणे करून कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर नियंत्रण करण्यास मदतच होईल. आणि त्यांच्या वर वेळीच इलाज करणे अधिक सोपे होईल व भीषण रोगाचा फैलाव होणार नाही.

आजच्या घडीला करोना विरुद्ध लढताना आपले अनेक शासकीय व पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत त्यापैकी काही मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे होते. शासन अजून किती लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे. त्यामुळे त्यांची तशी तजवीज केल्यास त्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल.

– लवकर निर्णय घेऊन कार्यवाहीची मागणी पनवेल तालुक्यात 6 ते 14 मे या काळात 140 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील काहींचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथे कामास असून बहुतेक सर्व पोलीस व शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आहेत. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्य शासनाला जाग येणार आहे का? का अशा अधिकारी, कर्मचारी वर्गाला वार्‍यावर सोडणार? असे प्रश्नही पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी उपस्थित केले. लवकर निर्णय घेऊन कार्यवाही व्हावी अन्यथा भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ उद्भवेल, अशी भीती प्रसाद हनुमंते यांनी व्यक्त केली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply