नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी
(दि. 30) आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमात त्यांनी जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी या कार्यक्रमात जल संरक्षणावर जोर दिला. ते म्हणाले की, पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून, पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत मोदींनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी ञ्च्गरपडहरज्ञींळ4गरश्रडहरज्ञींळ या हॅशटॅगचा वापर करीत सोशल मीडियावर मजकूर अपलोड करावा, असे आवाहनही या वेळी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले.
– पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एकेक थेंब वाचविण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, असे सांगून लोकांचा सहभाग आणि साहाय्य यांच्या मदतीने जलसंकटावर मात करू, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
– ‘मन की बात’मध्ये जिवंतपणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’बद्दल सांगताना म्हटले की, या कार्यक्रमात जिवंतपणा आहे. आपलेपणा आहे. त्यात मन गुंतले आहे म्हणूनच पुन्हा आपल्याला भेटायला आलो. यात मी बोलतो ते शब्द माझे असतात. आवाज माझा असतो, मात्र कथा, पुरुषार्थ आणि पराक्रम तुमचा असतो. गेल्या काही दिवसांमध्ये हा कार्यक्रम झाला नसल्याने मला प्रत्येक रविवारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, पण आजपासून पुन्हा तुमच्याशी संवाद साधत असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.