नवी मुंबई : बातमीदार
सिडको प्रदर्शनी केंद्रातील कोरोना रुग्णालयाची पाहणी मंगळवारी आमदार गणेश नाईक यांनी केली. वाशी येथील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. इतर आजारांसाठी त्यामध्ये उपचार करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्याकरिता हे कोरोना रुग्णालय वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात हलवावे आणि प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी खुले ठेवावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केलेली आहे.
या पाहणी दौर्याप्रसंगी आ. गणेश नाईक यांच्यासमवेत महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेता रविंद्र इथापे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, समाजसेवक राजेश मढवी आदी उपस्थित होते.
डायलिसिस करणे पालिका रुग्णालयाची जबाबदारी असल्याचे देखील आ. नाईक म्हणाले. महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयांमधून वेळेवर डायलिसिस न मिळाल्याने तुर्भे येथे राहणारे उपेंद्र तिवारी (35) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र देणार आहे. चौकशीअंती जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे आ. नाईक यांनी सांगितले. तिवारी डायलिसिससाठी रुग्णालयात गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी पाच दिवस गेले. या दरम्यान डायलिसिस न झाल्याने तिवारी यांना जीव गमवावा लागला होता.
‘मजुरांना मूळगावी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील’
नवी मुंबईतून त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी शेकडो परप्रांतीय मजूर प्रतीक्षेत आहेत. नवी मुंबईमधून या मजुरांसाठी अद्याप एकही गाडी सोडण्यात आलेली
नाही. नवी मुंबईतील परप्रांतीय मजुरांसाठी प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस प्रशासन आणि कोकण विभागीय प्रशासनाबरोबरच बोलणी सुरू असल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन येथील कोविड सेंटरच्या पाहणी दौर्यात दिली.