खोपोली : प्रतिनिधी
रूग्णसेवा देणार्या खालापूरातील दोन डॉक्टर आणि रूग्णवाहिका चालकांचा कोरोना
तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील कुंभिवली आदिवासीवाडीतील अठ्ठावीस वर्षीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो जखमी अवस्थेत असताना खालापूर आरोग्य केंद्रात आणले होते. डॉक्टरांनी उपचार केले परंतु नंतर त्याला जे जे रूग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले होते. खालापूर येथून एकशे आठ रूग्णवाहिकेत नेताना या रुग्णवाहिकेतील डॉक्टर, रूग्णवाहिका चालक तरूणाच्या संपर्कात होते. दुसर्या दिवशी उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. त्यावेळी शवविच्छेदन केले असता मृत तरूणाला कोरोनाची बाधा असल्याची माहिती समोर आले होते. त्यानंतर दोन डॉक्टर, रूग्णवाहिका चालक यांना ंक्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर तपासणी अहवाल निगेटिव्ह
आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मृत तरूणाला उपचारा दरम्यान मुंबईत कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता जास्त होती. परंतु तरी देखील त्याच्या उपचार करणारे डॉक्टर आणि संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब तपासणीनंतर निगेटिव्ह अहवाल आला आहे. डॉक्टरांची कमतरता असताना असे संकट आल्यास मोठी अडचण होईल. – डॉ. पी. बी. रोकडे, तालुका वैद्यकिय अधिकारी, खालापूर