महाड : प्रतिनिधी – महाड बाजारपेठ खुली करण्यात आली असून, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस बाजारात गर्दीने उच्चांक गाठला आहे. सर्वच दुकानांतून अंतर ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवला जात असल्याने महाड शहरवासीयांना धोका निर्माण झाला आहे. मुंबई, पुण्यातून मूळ गावी परतलेले चाकरमानी बाजारपेठेत खुलेआम फिरत असल्याने होम क्वारंटाइन नियम कागदावरच राहिला आहे.
महाड आणि ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकीकडे धोका निर्माण झाला असताना दुसरीकडे शासनाने काही दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली, मात्र बाजारपेठेतील सर्वच दुकाने गेली काही दिवसांपासून सरसकट सुरू झाली आहेत. यामुळे बाजारात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येत आहेत. ग्रामीण भागात जवळपास 15 हजारांच्या वर नागरिक दाखल झाले आहेत. हे सर्व होम क्वारंटाइन असले तरी घरातील सर्व जण त्यांच्या संपर्कात आहेत. हे सर्व जण महाडमध्ये आणि गावात देखील खुलेआम फिरत असतात. यामुळे ग्रामीण भागात वाददेखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे सर्व लोक खुलेआम बाजारात येत आहेत.