Breaking News

पोलादपूरमधील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील पळचिल येथे एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मंगळवारी (दि. 25) तुर्भे बुद्रुक येथील दाम्पत्याचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली. चौथ्या लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील चार गावांमध्ये सहा कोरोनाबाधित झाले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यासाठी स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी गावातील दोघांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उमरठ फौजदारवाडी येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांचे स्वॅब पनवेल येथील पथकाकडून गोळा करण्यात आले असून, पळचिल आणि निवाची वाडी येथील प्रत्येकी पाच, उमरठ चार, कापडे दोन अशी संपर्कात आलेल्या लोकांच्या स्वॅब नमुन्यांची

संख्या आहे.

तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील दोन जणांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी सांगितले. हे रुग्ण पती-पत्नी असल्याने त्यांच्या राहत्या घराचा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र, तर त्यालगतचा परिसर बफर झोन जाहीर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात 1 मेपासून सुमारे पाच हजारांहून अधिक चाकरमानी ग्रामस्थांना हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारूनही त्यांचा वावर संपूर्ण गावांत तसेच तालुक्यात दिसून येतो. अशातच गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्याची चिंता व्यक्त होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply