आमदार प्रशांत ठाकूर यांची विधीमंडळ अधिवेशनात मागणी
लवकरच सर्व आरोग्य केंद्र कार्यान्वित कार्यान्वित करणार ः आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त
राज्यातील बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली. त्या अनुषंगाने लवकरच सर्व आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी स्वरूपात दिले.
राज्यात सन 2021 ते सन 2025 या कालावधीत 416 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यःस्थितीत त्यातील 213 केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याचे मे 2025मध्ये निदर्शनास आले आहे. या आरोग्य केंद्रांना आवश्यक असलेले फर्निचर, वीज जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, काही ठिकाणी उद्घाटन कोण करणार असे प्रश्न निर्माण होणे तसेच आरोग्य कर्मचारी नेमण्यासाठी निधी देण्यात येत नसणे इ. कारणास्तव ही आरोग्य केंद्र अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मूलभूत सुविधांसाठी तत्काळ निधी वितरित करुन ही विनावापर असलेली आरोग्य केंद्र तातडीने कार्यान्वित करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही केंद्र तातडीने सुरू करून गावागावात दर्जेदार आरोग्य सेवा पोहचवावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून नमूद केले.
या प्रश्नावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, सन 2021 ते सन 2025 या कालावधीत 416 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून सद्यःस्थितीत काही केंद्र अद्याप सुरू झाली नसल्याची बाब अंशतः खरी आहे. सद्यःस्थितीत बांधकाम पूर्ण करण्यात आलेल्या 213 उपकेंद्रांपैकी 206 आरोग्य केंद्र कार्यान्वित झालेली असून उर्वरित आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे. 206 आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवा सुरू करण्यात आली असून उर्वरित 7 आरोग्य उपकेंद्रातील फर्निचर व वीज जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ही आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येतील तसेच या आरोग्य उपकेंद्रांत आरोग्यविषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पुरवणी मागणीचा प्रस्ताव विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper