

नागोठणे ः प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर आल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. 7 जूनपर्यंत शहराच्या सर्व भागातील कामे पूर्ण होतील, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूंचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आल्याने दोन महिन्यांत विषाणूंचा संसर्ग रोखण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रामपंचायत दरवर्षी शहरातील सर्व नाले तसेच गटारांची स्वच्छता मोहीम मे महिन्यात हाती घेत असते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून कोठेही तडजोड न करता संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येईल, असे मोहन दिवकर यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.