कोरोनाग्रस्तांच्या व्यवस्थेची पाहणी, चर्चा आणि आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) कामोठे एमजीएम रुग्णालय, कोन येथील इंडिया बुल्स आणि पनवेल महापालिकेला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांसंदर्भात चर्चा करून व्यवस्थेचा आढावाही घेतला.
कोविड-19 संसर्ग असलेल्या रुग्णांवर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर कोन गावाजवळील इंडिया बुल्स येथे क्वारंटाइन सेंटर आहे. या ठिकाणी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली तसेच रुग्णांना औषध, भोजन वेळेवर देण्याबरोबर रुग्णांची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना तेथील वैद्यकीय तज्ज्ञ व संबंधित अधिकार्यांना दिल्या.
या वेळी लोकप्रतिनिधींनी पनवेल महापालिकेलाही भेट देऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली. मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात रुग्ण तपासणीचा अहवाल येण्यास वेळ लागत असून, तेथील यंत्रणेवर भार पडत आहे. ते लक्षात घेता पनवेलसाठी महापालिका हद्दीत स्वतःची तपासणी लॅब असावी, अशी सूचना किरीट सोमय्या यांनी केली.
कोरोनाच्या काळात भाजप नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते झटून कार्यरत आहेत. विविध प्रकारे मदत असो की रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे असो भाजप पुढाकार घेत आहे.