अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार अलिबाग येथे नेऊली येथील जिल्हा क्रीडा संकुल आणि आरसीएफ शाळेत कोरोना केअर सेंटर्सची उभारणी केली जात आहे. यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत.
अलिबाग येथे जिल्ह्यातील 80 कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात डेडिकेटेट कोरोना सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे, मात्र दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचाराची क्षमताही वाढवावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग येथे दोन कोरोना केअर सेंटर्सची उभारणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. नेऊली येथील क्रीडा संकुलात 48, तर आरसीएफ शाळेत 60 रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोनाची बाधा असलेले मात्र कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या दोन्ही ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकताच या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी प्रांताधिकारी शारदा पोवार आणि तहसीदार सचिन शेजाळ उपस्थित होते. आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करून दोन्ही सेंटर्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत.