माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही त्याचा परिणाम शेतकरीवर्गावर नसल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त झाला आहे. सध्या पावसाळ्यापूर्व धूळ वाफेवरील पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे.
पावसाळा जवळ आला आहे. वातावरणात बदल होत असून, मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. खरिप हंगामाच्या शेतीची मशागत पूर्ण झाली आहे. तापणारे ऊन जरा विसावल्याने शेतकरी भात पेरणीच्या कामास लागले आहेत. तांदूळ, नाचणी, वरी व मिरचीचे तरव्याची पेरणी केली जात आहेत.
भल्या पहाटे नांगर व बैलजोडी घेऊन शेतात नांगरणी करून भाताचे बियाणे पेरले जात आहे. सोबत असणारी इतर माणसे नांगरणीनंतर ढेकळे फोडण्याचे काम करीत आहेत. पेरलेले बियाणे मातीवर राहून ते पाखरांनी खाऊ नये यासाठी ढेकळांची माती फोडली जाते. लॉकडाऊन असला तरी पेरणीच्या कामांना कोणतीही अडचण येत नसून पावसाळ्यापूर्वी शेतीची कामे पूर्ण करण्याकडे शेतकर्यांनी लक्ष दिले आहे.
पावसाळा जवळ आल्याने पेरणीची कामे आटपावी लागत आहेत. ऊन असताना पेरणी झाल्यास भाताचे वाण चांगले येते व गवत, तण जास्त वाढत नाही.
-सुनील बैकर, शेतकरी