आमदार रविशेठ पाटील यांची मागणी

पेण : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. अशा परिस्थिती रिक्षा चालकांवर देखील संकट आल्े असल्याने रायगड जिल्ह्यातील मिनिडोअर-रिक्षा चालक, मालक यांना राज्य शासनाची मदत मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील मिनिडोअर-रिक्षा चालक, मालक यांनी बँकेच्या कर्जावर सार्वजनिक खाजगी प्रवासी वाहतूक सेवेकरिता वाहने खरेदी केलेली आहेत. 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला व तेव्हापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हाताला अन्य कोणतेही काम नाही. सर्वजण मूळ रायगड जिल्ह्यातील असल्याने पोटापाण्यासाठी स्थलांतरित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशा स्थितीत हातावर पोट असणार्या या माणसांच्या कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह रोज हातावर मिळणार्या पैशावर अवलंबून आहे.
आजच्या परिस्थितीत कौटुंबिक खर्च भागवता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्याने राज्य शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.
दिल्ली शासनाने तेथील रिक्षा, टॅक्सीधारकांना ज्याप्रमाणे आर्थिक मदत केली. त्याप्रमाणे या लॉकडाऊन कालावधीतील नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी. तसेच या वाहनांच्या पासिंग, टॅक्स विमा आणि वाहन वयोमर्यादेबाबत सवलत द्यावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे.
याबाबत रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर, चालक मालक संघाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या शिष्टमंडळांनी रविशेठ पाटील यांची भेट घेऊन मागण्याचे सविस्तर निवेदन दिले होते. त्यांची दखल घेऊन आमदार रविशेठ पाटील यांनी शासनाकडे त्यांच्या मागणी बाबत मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.