पनवेल : बातमीदार – सानपाडा सेक्टर 19 परिसरातील एका 11 वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार केल्यानंतर सानपाडा पोलिसांनी या महिलेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील 11 वर्षीय मुलगी ही आई, वडील व लहान बहिणीसह राहते. आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली आहे. टीव्ही बंद न केल्यास हँगरने, कंगव्याने अथवा बेल्टने तसेच एकदा शाळेमध्ये जाताना लाथेने मारहाण केल्याचे या मुलीने तक्रारीत म्हटले आहे. आईने गरम चमच्याने डाव्या गालावर चटका दिल्याचे तसेच लहान बहिणीलादेखील मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ती नेहमीच घाणरेड्या भाषेत बोलते व आय विल किल यू असे नेहमी बोलते. मी तुझ्यासाठी व तुझ्या वडिलांसाठी स्वयंपाक करणार नसून केवळ माझ्यासाठी व तुझ्या लहान बहिणीसाठी स्वयंपाक करणार असल्याचे सांगत ती वारंवार भेदभाव करते असेही या मुलीने म्हटले आहे.
या मुलीने वडिलांच्या मदतीने जिल्हा कुटुंब न्यायालयातही ऑनलाइन तक्रार केली आहे. या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतरही तिने मला व माझ्या वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे या मुलीने म्हटले आहे. सानपाडा पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.