मुंबई ः प्रतिनिधी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सचिन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोनावर यशस्वीरित्या मात करून तो रुग्णालयातून घरी परतला असून, राहत्या घरी विलगीकरणात राहणार आहे.
सचिनने कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती त्याच्या ट्विटर हँडलवर दिली. ‘नुकतेच रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात असून आराम करीत आहे. सर्व चाहत्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी मी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांचे आणि डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो,’ असे ट्विट सचिनने केले आहे. गेल्या महिन्यात रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिकेत सहभागी झालेल्या सचिनच्या कोरोना चाचणीचा अहवाल 27 मार्चला सकारात्मक आला होता.
कोरोनाची लागण झाल्यानंतर सचिन राहत्या घरीच क्वारंटाइन होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते, पण 2 एप्रिल रोजी त्याने ट्विट करीत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती.