Breaking News

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

नैऋत्य मोसमी पाऊस या वेळेला जूनच्या 5 तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता, परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अम्फाम चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. यावर्षी 30 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून यामुळे वादळी हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यातील सर्व मच्छीमार संस्था त्याचप्रमाणे तत्सम संस्थांना आदेश काढला आहे की 1 जून ते 4 जून या काळामध्ये कोणीही आपल्या नौका समुद्रात घेऊन जाऊ नये.

वादळी वातावरणामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीसुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला अगोदर क्यार नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते. या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला बसला, परंतु हे वादळ रायगडकडे न सरकता ते ओमान या देशाच्या दिशेने सरकल्याने रायगड जिल्हा, मुंबई, पालघर तसेच गुजरात या ठिकाणी वादळाचे परिणाम दिसून आले नाहीत. शनिवारपासूनच श्रीवर्धन येथेदेखील अरबी समुद्राच्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे बदल पाहायला मिळत आहेत. समुद्राच्या पाण्याचा आवाज वाढला असून पाण्याचा रंगदेखील तांबूस झाला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका कालपासूनच समुद्राबाहेर घेण्यास सुरुवात केली आहे. 1 जून ते 30 जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीवरील मासेमारी शासकीय आदेशानुसार बंद असते. त्यामुळे मच्छीमार बांधव आपल्या नौका समुद्रातून बाहेर घेऊन त्या शाकारून ठेवतात.

1 जूनपासून  31 जुलै या कालावधीमध्ये समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. शासनाने तशा प्रकारे बंदीचा आदेश काढला आहे. तसेच 1 जून ते 4 जून या कालावधीमध्ये समुद्रात वादळ होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तरी वादळाची परिस्थिती पाहता व बंदीचा आदेश पाळून मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये व आपापल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, अलिबाग

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply